संत नामदेवांचे अभंग वेषधार्‍यांस उपदेश

Veshdharyans Updesh : Sant Namdev Ji

वेषधार्‍यांस उपदेश
1

एक ह्मणती आह्मी देवचि जालों । तरी असे नका बोलों पडाल पतनीं ॥१॥
एक ह्मणती आह्मीम देवासमान । तरी घासील वदन यमराम ॥२॥
एक ह्मणती आह्मी देवाचींच रूपें । तुमच्यानि बापें संसार न तुटे ॥३॥
देवें वघियेलें दानवां दैत्यां । आह्मां आड जातां तृण न मोडे ॥४॥
देवें उचलिल्या शिळा मेदिनी । तुमचेनी एक गोणी नुचले देखा ॥५॥
विठ्ठलाचे पद जो कोणी अभि-लाषी । तो महा पातकी ह्मणे नामा ॥६॥

2

त्यागेंवीण विरक्ति । प्रेमावांचूनि भक्ति । शांति नसतां ज्ञप्ति । शोभा न पवे ॥१॥
दमनेंवाचूनि यति । मानाविण भूमि-पति । योगि नसतां युक्ति । शोभा न पवे ॥२॥
बहिर्मुख लवि-मति । नेमावांचूनियां वृत्ति । बोधेंविण महंती । शोभा न पषे ॥३॥
अनधिकारीं व्युत्पत्ति । गुरु तो कनिष्ठ पाति । माता नीच शिश्र वृत्ति । शोभा न पवे ॥४॥
हेतुबांचूनि प्रीति । गुणरहित स्तुति । करणीवांचूनि कीर्ति । शोभा न पवे ॥५॥
सत्यमागमसंगती । बाणली नसतां चित्तीं । नामा ह्मणे क्षिति । शोभा न पवे सवर्था ॥६॥

3

निर्विकल्प ब्रह्म कशानें आतुडें । जंववरी न मोडे मी तूं पण ॥१॥
शब्द चित्रकथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं निश्चळ हरिच्या पायीं ॥२॥
अणूच्या प्रमाण होतां दुजेपण । मेरूच्या स-मान भार देवा ॥३॥
नामा ह्मणे ब्रह्म सर्वांभूतीं पाहीं । तरींच ठायींच्या ठायीं निवसी बापा ॥४॥

4

सोंगाचें वैराग्य अनर्थ हें मूळ । आशा तें केवळ मिथ्या जाण ॥१॥
अंतरापासूनि नसतां विवेक । निभ्रांत चकट आशावटी ॥२॥
राजस तामस करोनियां गोळे । होताति आंधळे दाटोनियां ॥३॥
नामा ह्मणे ऐशा उदंड उपायें । विठोबाचे पाय अंतरिती ॥४॥

5

युगें गेलीं जरी अपारें । भूमिसी न मिळती खापरें ॥१॥
ऐसीं पापियांचीं मनें । स्थिर न होतीं कीर्तनें ॥२॥
श्वान घा-तलें पालखीं । वरतीं मान करूनि भुंकी ॥३॥
सूकर चंदनें चर्चिला । पुढती गवसी चिखला ॥४॥
गाढव न्हाणियला तीर्थी । लोळे उकर-डियाप्रती ॥५॥
नामा ह्मणे युगें गेलीं । खोडी न संडिती आपुली ॥६॥

6

मुखीं नाहीं नाम । काय जपतो श्रीराम ॥१॥
काय आसन घालून । मुखीं नाहीं नारायण ॥२॥
टिळे टोपी माळा दावी । भोळ्या भाविकांसी गोवी ॥३॥
नामा ह्मणे त्याचा संग । नको चिंता होय भंग ॥४॥

7

गोमुखीं गोवूनि काय जपतोसी । जपतप त्यासी विघ्न करी ॥१॥
नामसंकीर्तनें जळतील पापें । चुकतील खेपा चौर्‍यांशींच्या ॥२॥
उपवास करी उग्र अनुष्ठानी । तया चक्रपाणी अंतरतो ॥३॥
नामा ह्मणे ऐसे बहुतेक प्राणी । पचतील खाणी भ्रष्टलोक ॥४॥

8

कांचनीक भक्ति सर्वकाळ करी । बहुतांचे वैरी हित नेणें ॥१॥
लोकांपुढें सांगे आम्ही हरिभक्त । न होय विरक्त स्थिति ज्याची ॥२॥
असंतोषी सदां अतितासी जाळी । सुक्रुताची होळी स्वयें केली ॥३॥
वेदमर्यादा सांडूनि चालती । हुंबतें घेती वार्‍यासवें ॥४॥
नामा ह्मणे आतां असो याचि मात । सुख नेणें हित कदा काळीं ॥५॥

9

हरिदासपणें उभवीला ध्वज । परि तें वर्मबीज न क-ळेची ॥१॥
काय करूं देवा जळो याची बुद्धि । जोंवरी नाहीम शुद्धि परलोकाची ॥२॥
मुद्रा धरूनि गळां घाली तुळसीमाळा । परि नाहीं जिव्हाळा स्वहिताचा ॥३॥
धरी बहु वेष वृथा करी दोष । नाम ब्रह्मरस अंगीं नाहीं ॥४॥
दुसरा हरिदास देखूनियां रंगीं । धांवो-निमां वेगीं ग्रासों पाहे ॥५॥
दुसरियाचें पद ऐकोनियां कानीं । क्रोधें पेटे वन्हि पर्वतींचा ॥६॥
दुर्जनाचे भये पळती साधुवृंदें । जैसीं तीं श्वापदें व्याघ्रा भेणेम ॥७॥
बोले नानायुक्ति वश करे सभा । दुसरा रंगीं उभा राहों नेदी ॥८॥
राजमानें श्रेष्ठ मोठे अधिकारी । त्यांपुढें कुसरी करिताती ॥९॥
घातमात करी नटे नानापरी । चं-चळ परनारी भुलवितो ॥१०॥
ऐसें नाम विटंबूनि करील जो हरि-कथा । तेणें परमार्था विघ्न केलें ॥११॥
जाई जुई उत्तम सुगंध क-स्तुरी । विष्टेच्या उदरीं आंथुरिला ॥१२॥
साडेपंधरा सोनें होतें पालवण्या । परि झालें हीण डीक लागें ॥१३॥
द्यावें दिव्यौषध रोगियाचें हित । केलिया कुपथ्य वांयां जाय ॥१४॥
चतुर्विध अन्न षड्रस पक्कान्नें । विटाळलें जाण श्वानमुखें ॥१५॥
ऐसें ह्मणतां माझी मळेल पैं वाचा । परि या वैष्णवांचा धर्म नव्हे ॥१६॥
संसारसागरु हरिकथा तारूं । तरिजे विचारू दुरी ठेला ॥१७॥
जे कथा ऐकती पसरोनी बाह्या । शांति क्षमा दया येती तेथें ॥१८॥
शांति क्षमा दया येती भेटावया । तेथें मोक्ष व्हावया विलंब काय ॥१९॥
आ-नंद नामाचा ऐकूनि गजर । ब्रह्मादिक हरिहर येती तेथें ॥२०॥
खुंटला अनुवाद मावळला शब्द । अनिर्वाच्य बोध प्रगटला ॥२१॥
वैकुंठ पांडून धांवें चक्रपाणि । कीर्तनाचा ध्वनि ऐकूनियां ॥२२॥
तेथें श्रोते वक्ते होतील नि:शाय । ऐशी पुण्यरूप हरिकथा ॥२३॥
शून्याचें नि:शून्य जेथें हरपलें । एकात्र मन झाले ध्यान तेथें ॥२४॥
नामा म्हणे माझी हरिकथा माउली । मोक्षपान्हा घाली भक्ता लागीं ॥२५॥

10

गुंडालिल्या जटा तोचि माथा केटा । गोजिरा गोमटा रामचंद्र ॥१॥
वैकुंठींचा राजा म्हणवितो योगी । दावावया जगीं योग करी ॥२॥
आकर्ण लोचन हातीं चापबाण । वल्कलें भूषणें नेसोनियां ॥३॥
पितृवचनालागीं मानोनि साचारी । झाला पादचारी वनीं हिंडे ॥४॥
देवंचिया काजीं ठेवोनियां निज । सर्वांपरी सज्ज झाला अंगें ॥५॥
नामा म्हणे त्याचें न कळे कौतुक । आपु-लिया सुख वाढावया ॥६॥

11

सिबुर दावूनि बैसलें हातीं । सांगतांहे गोष्टी जाणी-वेच्चा ॥१॥
कापियेलें नाक झाले ते नि:शंक । वारे भुरभुरां देख वाजतसे ॥२॥
दवडा दवडा परतें करील निंदा । ध्यावा कां कांदा मुळींहुनी ॥३॥
नामा विनवीतसे केशवातें सत्ता । उरलें सुरले आतां अवघे तासां ॥४॥

12

यज्ञादिक कर्म करूनि ब्राह्मण । दंभ आचरण दावी लोकां ॥१॥
लोकांसी दाविती मीच कर्मनिष्थ । अभिमान खोटा वागविती ॥२॥
वागविती वाक्य जाण ऋषेश्वर । नको येरझार नामामतें ॥३॥
नानामतें अधोऊर्ध्वसात जावीं । नको गोवागोवीं नामा ह्मणे ॥४॥

13

नाहीं परमार्थ पोटीं धनाचि आशा । धरूनि हव्यासा धनमान ॥१॥
दंभमान दावी ज्ञानमार्ग मोठ । पुढिलांसी वाटा यम-पंथें ॥२॥
पंथ न चुकती संतांवीण कधीं । संसारसंबंधीं तया नरा ॥३॥
नामा ह्मणे ऐसे बहू अभाविक । संतसंगसुख काय जाणे ॥४॥

14

गोसावीपणाचा दाखविती वेष । नाहीं निदिध्यास हरिनामीं ॥१॥
वरी वरी आर्त दाविती झगमग । अंतरीं तो संग विषयाचा ॥२॥
व्यर्थ लोकांपुढें हालविती मान । विटंबन केली संसाराची ॥३॥
नामा ह्मणे मन गुंतेल पांडुरंगा । आतां ऐशा सांगा कोण रीती ॥४॥

15

गेला परमहंस परिवारासहित । कोल्हाळ करिती मायबहिणी ॥१॥
काय हे नगरी पांचही तराळ । निद्नेनें भ्रमले व्याकुळ झाले ॥२॥
गेला मागून दिसे कवणिये वाटे । नवही द्वारें सपाट पडलीं ओस ॥३॥
नामा ह्मणे चोरी एके अंगणांत । दिवसा रात्रीं पडत खाण तेथें ॥४॥

16

विष्णूसी भजला शिव दूराविला । अध:पात झाला तया नरा ॥१॥
शिवपूजा करी विष्णूसी अव्हेरी । तया-चिये घरीं यम नांदे ॥२॥
विष्णुकथा ऐके शिवासी जो निंदी । त-यासी गोविंदा ठाव नाहीं ॥३॥
नामा ह्मणे असती शिवविष्णु एक । वेदाचा विवेक आत्माराम ॥४॥

17

डोई बोडून केली खोडी । काया वागविली बापुडी ॥१॥
ऐसा नव्हे तो संन्यास । विषय देखोनि उदास ॥२॥
मांजराचे गेले डोळे । उंदीर देखोनि तळमळे ॥३॥
वेश्या झाली पाटाची राणी । तिला आठवे मागील करणी ॥४॥
नामा म्हणे वेष पालटे । परी तिला अंतरीचें ओसपण न तुटे ॥५॥

18

तोंवरी रे तोंवरी वैराग्याचें ठाण । जंव कामिनी कटाक्ष बाण लागले नाहीं ॥१॥
तोंवरी रे तोंवरी आत्मज्ञान बोध । जोंवरी अंतरीं कामक्रोध उठले नाहीं ॥२॥
तोंवरी रे तोंवरी निरभिमान । जंव देहीं अपमान झाला नाहीं ॥३॥
नामा ह्मणे अवघी बचबच गाळी । विरळा तो जाळी द्वैत बुद्धि ॥४॥

19

चंद्र सूर्यादि बिंबें लिहिताती सांग । परि प्रकाशाचें अंग लिहितां नये ॥१॥
संन्यासाचीं सोंगें आणिताति सांग । परि वैराग्याचें अंग आणितां नये ॥२॥
नामा म्हणे कीर्तन करिताति सांग । प्रेंमाचें तें अंग आणितां नये ॥३॥

20

पोटासाठीं जरी करी हरीकथा । जन रंजविता फिर-तसे ॥१॥
तेणें घात केला एकोत्तरशत कुळांचा । पाहुणा यमाचा श्रेष्ठ थोर ॥२॥
द्रव्याचिये आशें हरिकथा करी । तया यमपुरीं नित्य वास ॥३॥
नामा म्हणे ऐसे होत जे रे कोणी । ते नर नयनीं पाहूं नये ॥४॥

21

हरिभक्त म्हणविणें हरिदर्शना नाहीं जाणें । बोलतां लजिरवाणें अहोजी देवा ॥१॥
पतिव्रता म्हणविणें आणि परपुरुषीं विचारणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥२॥
क्षत्रिय म्हण-विणें आअणि पाठिशीं घाय साहणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥३॥
पितृभक्त म्हणविणें आणि पितृआज्ञा न करणें । बोलतां लजिरवानें अहोजी देवा ॥४॥
ऐसे भक्त किती गेले अधोगति । नामा ह्मणे श्रीपति दास तुझा ॥४॥

22

कडू वृंदावन साखरें घोळिलें । तरी काय गेलें कडू-पण ॥१॥
तैसा तो अधम करो तीर्थाटण । नोहे त्याचें मन निर्मळत्व ॥२॥
बचनाग रवा दुग्धीं शिजविला । तरी काय गेलेआ त्याचा गुण ॥३॥
नामा म्हणे संत सज्जन संगतीं । ऐशासही गति कळांतरीं ॥४॥

23

दावी जडबुद्धि जारण मारण । नागवें हिंडणें काय काज ॥१॥
दावी उग्र तप केले उपवास । फिरतांही देश काय काज ॥२॥
काय काज तरी होसील फसीत । स्मरोर अनंता सर्व-काळ ॥३॥
नामा म्हणे नव्हे उदंड उपाय । घरीं आधीं पाय विठोबाचे ॥४॥

24

लांब लांब काय सांगशील गोष्टी । करा उठाउठी निरभिमान ॥१॥
मी तूं पण जंव दंभ गेला नाहीं । साधिलें त्वां न कांहीं तत्त्वसार ॥२॥
अहंभाव देहीं प्रपंचाचे दृष्टी । काय चाले गोष्टी रोकडी ते ॥३॥
नामा ह्मणे ऐसें नेणती विचार । जाती निरंतर यमपंथें ॥४॥

25

वेदाध्ययन करिसी तरी वैदिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥१॥
पुराण सांगसी तरी पुराणीकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥२॥
गायन करिसी तरी गुणीजन होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥३॥
कर्म आचरसी तरी कर्मठचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥४॥
यज्ञ करिसी तरी याज्ञिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥५॥
तीर्थ करिसी तरी कापडीच होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥६॥
नामा ह्मणे नाम केशवांचे घेसी । परीच वैष्णच होसी अरे जना ॥७॥

26

मी तूं हें कथन सांगसी काबाड । विठ्ठल येवढें न सांगसी ॥१॥
ऐसें कांहीं सांग जेणें फिटे पांग । नित्य पांडुरंग-भजन सोपें ॥२॥
मी आणि तूं हें वचन हो खोटें । विठ्ठलीं विनटे दिननिशीं ॥३॥
नामा ह्मणे भाव ऐसा धरीं सकळ । तुष्टेल गोपाळ न विसंबितां ॥४॥

27

मुखीं नाम हातीं टाळी । दया नुपजे कोणे काळीं ॥१॥
काय करावें तें गाणें । धिक्‍ धिक्‍ तें लजिरवाणे ॥२॥
हरिदास म्हणोनि हालवी मान । कवडीसाठीं घेतो प्राण ॥३॥
हरिदासा़चे पायीं लोळे । केशीं धरोनि कापी गळे ॥४॥
नामा म्हणे अवघे चोर । एक हरिनाम हें थोर ॥५॥

28

ताकहि पांढरें दूधहि पांढरें । चवी जेवणारे जाणवीते ॥१॥
केळाच्या पाठीवर ठेविला दोडका । तोहि ह्मणे विका तेणें मोलें ॥२॥
ढोर ह्मणती आह्माम हाकारे लास । वारुवा सरसे खाऊं द्या घांस ॥३॥
मंदल्याजेती घरोघरीं गाती । धृपदासाठीं ताक मागती ॥४॥
नामा म्हणे सोपीं कवित्वें झालीं फुका । हरि हरि म्हणा आपुलिया सुखा ॥५॥

29

शास्त्रज्ञ पंडित तो एक मी मानी । आपणातें देखोनी तन्मय झाला ॥१॥
येरां माझें नमन सर्व साधारण । ग्रंथांचें रक्षण म्हणोनियां ॥२॥
वेद पारायण मानीं तो ब्राह्मण । चित्त समाधान संतुष्ट सदा ॥३॥
पुराणिक तो होऊनि कृतार्थ । विषयीं विरक्त विधि पाळी ॥४॥
मानीं तो हरिदास ज्या नामीं विश्वास । सर्वस्वें उदास देहभावा ॥५॥
नामा ह्मणे ऐसे भेटवीं विठ्ठल । त्यालागीं फुटला कंठ माझा ॥६॥

30

योग याग यज्ञ इच्छिसी कामना । परि केशव निधाना विसरसी ॥१॥
नेणेचि हें मन भुललें अज्ञानें । यातायाति पतनें भोगूं पाहे ॥२॥
ज्याचेनि जाहलें तुझें हें शरीर । त्याचा नामो-चार नये वाचे ॥३॥
नामा म्हणे कांरे नेणसी अझुनी । केशवचरणीं अनुसरे कां ॥४॥

31

हरिभक्ति आथिले तेचि उत्तम । येर ते अधम अध-मांहुनी ॥१॥
हरिभक्तीं सप्रेम तेंचि तैसें नाम । येर ते अधम अना-मिक ॥२॥
नामा म्हणे जया नाहीं हरिसेवा । ते जितची केशवा प्रेत जाणा ॥३॥

32

भुजंग विखार पवनाचा आहार । परि योगेश्वर म्हणों नये ॥१॥
पवनाच्या अभ्यासें काया पालटी । परि तो वैकुंठीं सरता नहे ॥२॥
शुद्ध करी मन समता धरोनि ध्यान । तरीच भवबंधन तुटेल रे ॥३॥
पवित्र गंगाजळ मीन सेवी निर्मळ । परि दुष्ट केवळ कर्म त्याचें ॥४॥
अवचिता हेतु सांपडला गळीं । न सुटे तयेवेळीं तीर्थो-दकें ॥५॥
घर सांडोनियां वन सेविताती । वनीं कां नसती रीस व्याघ्र ॥६॥
काम क्रोध लोभ न संडवे मनीं । असोनियां वनीं कोण काज ॥७॥
बहुरुप्याचा नटा माथां भार जटा । भस्म राख सोटा हातीं दंड ॥८॥
धोति पोति कर्मावेगळा आदेसें । हुंबरत असे अंगबळें ॥९॥
त्रिपुंड्र टिळे अंगीं चंदनाची उटी । घालेनियां कंठीं तुळसी-माळा ॥१०॥
व्यापक हा हरि न धरिती चित्तीं । लटिकीयाची गति गातु असे ॥११॥
मीतूंपण जरी हीं दोन्हीं सांडी । राखिसी तरी शेंडी हेंचि कर्म ॥१२॥
मानसी तूं मुंडीं देहभाव सांडी । वासनेसी दंडी आत्ममयें ॥१३॥
मन हें दर्पण करोनि निर्मळ । पाहे पां केवळ आत्मास्वयें ॥१४॥
तुझा तूं केवळ तुजमाजी पाहीं । नामा म्हणे ध्यायी केशिराजु ॥१५॥

33

सात्विक हें वैराग्य अर्थाचें हें मूल । आशा हें केवळ अनर्थ जाणा ॥१॥
अंतरापासोनी नसतां विवेक । निभ्रांताचे टक आशेवरी ॥२॥
राजस तामस करोनियां गोळा । होतसे अंधळा दाटोनियां ॥३॥
नामा म्हणे ऐसे उदंड उपाय । विठोबाचे पाय अंतरती ॥४॥

34

अहंकारें आथिलें ऐसें जें शरीर । तें जाणा मंदिर चांडाळाचें ॥१॥
आपुलिया मुखें सांगे पंढरिनाथ । नव्हेचि तो भक्त सत्य जाणा ॥२॥
नाम विठंविती संतांचि हांसती । ते मूर्ख ह्मणि-जेती सर्पपिलीं ॥३॥
तयांसि लक्ष्मीवल्लभ सांगे उपदेश । नामा विष्णुदास विनवीतसे ॥४॥

35

काय करूनि तीर्थाटणें । मन भरिलें अवगुणें ॥१॥
काय करावें तें तप । चित्तीं नाहीं अनुताप ॥२॥
मन:संकल्पाचीं पापें । न जाती तीर्थाचेनि बापें ॥३॥
नामा म्हणे सर्व सोपें । पाप जाय अनुतापें ॥४॥

36

करीना साधन जिवासी बंधन । कोणे काळीं मन नोहे शुद्ध ॥१॥
करूं जातां तप अभिमानरूप । त्रिविधादि ताप कैसा निवे ॥२॥
नित्यानित्य करी विवेक आपण । तेणें अभि-मान वाढतसे ॥३॥
नामा ह्मणे जन्म विसरोनियां गेलों । मरोनि राहिलों देहातीत ॥४॥

37

शिकला गाणें राग आळवण । लोकां रंजवण करावया ॥१॥
भक्ताचें तें गाणें बोबडिया बोलीं । तें तें विठ्ठलीं अर्पियलीम ॥२॥
बोबडिया बोलीं जे कोणी हांसती । ते पचिजेती रौरवीं ॥३॥
नामा म्हणे बहुत बोलों आतां कांई । विठोबाचे पाय अंतरती ॥४॥

38

सुवर्ण आणि परिमळ । हिरा आणि कोमळ । योगी आणि निर्मळ । हें दुर्लभ जी दातारा ॥१॥
देव जरी बोलता । तरी कल्पतरु चालता । गज जरी दुभता । हें दुर्लभ जी दातारा ॥२॥
धनवंत आणि दयाळु । व्याघ्र आणि कृपाळु । अग्नि आणि सीतळु । हें दुर्लभ जी दातारा ॥३॥
सुंदर आणि पतिव्रता । साव-धान होय श्रोता । पुराणिक तरी ज्ञाता । हें दुर्लभ जी दातारा ॥४॥
क्षत्रिय आणि शूर भला । चंदन फुलीं फुलला । स्वरूपीं गुण व्यापिला । हे दुर्लभ जी दातारा ॥५॥
ऐसा संपूर्ण सर्व गुणीं । केवी पाविजे शारंगपाणी । विष्णुदास नामा करी विनवणी । मुक्ति चरणीं त्याचिया ॥६॥

39

शब्दामृत मांडे येती भोजना । अभ्यासी अज्ञाना तरी फळें ॥१॥
मुंगीचे थडके फुटे जों आकाश । ब्रह्मत्वेम सायास नये हातीं ॥२॥
मशका ओढी मेरू हाले बुडीं । जीवाचे ते जोडी ब्रह्म मिळे ॥३॥
उदकीं जरी मासोळी सूर्यासी भेटे । वारियाचे कोठें दृष्टि पडे ॥४॥
चंद्राचें चांदणें घेती जे पालवी । मिथ्या माया देवी नामा म्हणे ॥५॥

40

नामाचें लेखन श्वानाचिये कानीं । धांवतसे घाणी चर्माचिये ॥१॥
विंचू ह्मणतसे मी उदार दाता । उचित हें देतां नलगे वेळ ॥२॥
सूकर ह्मणे गृहस्थ भला । शेखीं तयाचा डोळा विष्ठेवरी ॥३॥
नापिक ह्मणे माझी । नांदणूक मोठी । धोकटिं मा-झारीं जन्म गेला ॥४॥
नामा ह्मणे माझी वासना हे खोती । विठ्ठल चरणीं मिठी पडली असे ॥५॥

41

ओढळातें सुणें बैसे विहिरणी । तेथें काय गुणी प्रगटेल ॥१॥
देव खादलें ते काय करी जाणा । सर्व अवगुण तयापासीं ॥२॥
अवघीं संतति कावळे पोशिले । जावोनि बैसले विष्टेवरी ॥३॥
भुजंगाचे मुखीं अमृत घातलें । फिरोनि पाहिलें विषयम ॥४॥
नामा ह्मणे ऐसे अभक्त निर्लज्ज । त्यांसि केशिराज उपेक्षील ॥५॥

42

कांडितांचि कोंडा न निघे तांदूळ । शेरा कैंचे फळ अमृताचें ॥१॥
कण्हेरीच्या मूळा सुगंध तो नाहीं । कसाबाची गाई जिणें कैचें ॥२॥
रुईदूध जरी येईल । भोजना । लेभियाच्या धना वेंच नाहीं ॥३॥
निर्फळ हें जिणें भक्ताविण मन । नामा म्हणे जाण नये कामा ॥४॥

43

बुजवणें शेतीं माणसें ह्मणती । काय त्याचें हातीम शस्त्र शोभे ॥१॥
हंसाशीं विरोध करीत कावळा । नेणे त्य़ाची कळा उंचपणें ॥२॥
अनामिकासंगें पाठवितां पंडिता । तो तयातें तत्वतां काय जाणे ॥३॥
नामा म्हणे बापा करूं नको तैसें । विचार कायसे पाहसील ॥४॥

44

बेडूक म्हणजे चिखलाचा भोक्ता । क्षीर सांडूनि रक्ता गोचीड झोंबे ॥१॥
जयाची वासना तयासीच गोड । प्रेमसुखचाड नाहीं तया ॥२॥
वांझ ह्मणे मी वाढवितेम जौंझार । उघडावया कैवाड नाहीं कोणी ॥३॥
अस्वलाचें तेल माखियलें कानीं । तें ह्मणे रानीं थोर सुख ॥४॥
स्वामीचिया कानी खोविली लेखणी । ते घेत असे धणी घरोघर ॥५॥
गाढवासी लविली तूप पोळी डाज । भुंके आळोआळ लाज नाहीं ॥६॥
सूफरा कस्तूरी चंदन लविला । तो तेथोनि पळाला विष्टा खाया ॥७॥
नामा ह्मणे माझें मन हें वोळलें । धरिलासे गोपाळ सोडीचिना ॥८॥

45

भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । तैसे आचार गौरब । सुकुलिन जनाचे ॥१॥
झाड जाणावें फूलें । मानस जाणावें बोलें । भोगें जाण्याबेम केलें । जन्मांतरींचें ॥२॥
लोभ जाणावा उभय दृष्टी । क्रोध जाणाव भोवया गांठीं । लटिका जाणावा बहु गोष्टी । नष्त प्रकृति ओळखावा ॥३॥
द्वाही घातलिया जाणावा खरा । ढोकळ जाणावा कली अबसरा । परद्बारिणी जाणावी उण्या उत्तरा । कुश्चळी घरोघरीं हिंडतसे ॥४॥
मृदंग जाणावा गंभीर नांदे । गाणें जाणावें सुस्वर शब्दें । ओंकार जाणावा अक्षरभेदें । शाहाणा शब्दें ओळखावा ॥५॥
विष्णुदास नामा करी विनंती । या उत्तराची न मानाची खंती । केशवाचा प्रसाद आहे माझे चित्तीं । देवा काय करिसी तें न कळे ॥६॥

46

मांजरें केली एकादशी । इळवरी होतें उपवासी । यत्न करितां पारण्यासी । धांऊनि गिवसी उंदिरु ॥१॥
लांडगा वै-सला ध्यानस्थ । तोंवरी असे निवांत । जंव पेट सुटे जीवांत । मग घात करी वत्साचा ॥२॥
श्वान गेले मलकार्जुना । देह कर्वतीं घातलें जाणा । आलें मनुष्यदेहपणा । परि खोदी न संडी आपुली ॥३॥
श्वानें देखिला स्वयंपाक । जोंवरि जागे होते लोक । मग नि-जलिया नि:शंक । चारी मडकीं फोडिलीं ॥४॥
वेश्या झाली पति-व्रता । तिचा भाव असे दुश्रिता । तिसी नाहीं आणिक चिंता । परद्वारावांचुनि ॥५॥
दात्यानें केली समाराधना । बहुत लोक जे-विले जाणा । परि न संडी वोखटी वासना । खटनट चाळितसे ॥६॥
ऐशा प्रकारच्या भक्ति । असती त्या नेणों किती । एक ओळंगा लक्ष्मीपति । ह्मणे विष्णुदास नामा ॥७॥

47

अंतरीं आवेश धरूनि कामाचा । लटकी जल्पे वाचा शब्द ज्ञानें ॥१॥
बोलाचे पैं मांडे क्षीर घारी अन्न । तेणें समाधान केविं होय ॥२॥
बोलिल्यासारिखें न करी पाम र । वृथाचि कुरकुर वाढविली ॥३॥
नाहीं जीव तया प्रेता आलिंगन । तैसें तें श्रवण केल्या होय ॥४॥
नामा ह्मणे त्याच्या संगे स्थिति दुषे । झाला लाभ नासे तेथें आतां ॥५॥

48

सोंवळीं पिळूनि कां घालिशी । मुद्रेनें आंग कां जा-ळिशी ॥१॥
कासया केली खोडी । काया विटंबिली बापुडी ॥२॥
कावळा प्रात:स्नान करी । जितें मेलें तें न विचारी ॥३॥
मैदें लावूनि द्बादश टिळे । तो फांसा घालूनि निवटी गळे ॥४॥
सुसरी गंगे रहिवासु । बहुतां जीवांते करी ग्रासु ॥५॥
गंगे गेल्य ज्ञान सांगे । मांजर मारिलें तें न सांगे ॥६॥
बक ध्यान लावूनि टाळी । मौन धरूनियां मासा गिळी ॥७॥
नामा ह्मणे केशिराजा । ऐशिया जीवा लावी वोजा ॥८॥

49

आपलें हित आपण नेणती । पुढिलांतें सांगती बहु ज्ञान ॥१॥
नेणोनि परब्रह्म जाणते झाले । अभावीं गुंतले माया-जाळीं ॥२॥
जीव आणि शीव एकरूप ह्मणती । सेवेसी अंतरती केशवाचे ॥३॥
नामा ह्मणे तोचि केशवातें जाणतां । केशव ह्मणतां मुक्त होय ॥४॥

50

उपाप असतां अपाय मानिती । तया अधोगति न चुकती ॥१॥
मनुष्या माझारी तो एक गाढव । तया अनुभव काय करी ॥२॥
नामा ह्मणे देव ऐसियासी कैसा । काया मनें वाचा भेदवादी ॥३॥

51

जो कां करी संतनिंदा । त्यासि दंडावें गोविंदा ॥१॥
करी संतासीम पाखंड । त्याचें करावें त्रिखंड ॥२॥
निंदक दंडावे दंडावे । नेऊनि अंधारीं कोंडावे ॥३॥
नामा म्हणे सांगेन एक । निंदक श्वानाचे ते लोक ॥४॥

52

संत ते कवन असंत ते कोण । सांगावी हे खूण दोही माजी । देवा तुजकारणें ऐसें झालें ॥१॥
पैल संत म्हणोनि जवळी गेलें । तेणें अमृत म्हणोनि विष पाजिलें । जीवासि घेतलें जालें तैसें ॥२॥
संसारेम गांजिलें गुरु गिरवसितीं । भगवे देखोनि तारावें ह्मणती । तंव ते नेणोनि उपदेशाची रीति । कुकर्मी घालिती तैसेम झालें ॥३॥
कोणी एक प्राणी सागरा पातले । पैल तारूं म्हणोनि जवळी गेले । तंव तारूं नव्हेती तेथिंचे हेर । बुडविती शरीर तैसें झालें ॥४॥
कोणी प्राणी हिंवें पीडिलें । पैम झाडी म्हणोनि जवळी गेलें । तंव अस्वल खिंखाळत उठिलें । नाक कान तोडिलेम तैसें झालें ॥५॥
कोणी एक अंधारी पडिला प्राणी । जवळी गेला पैल दीप म्हणोनि । दीप नव्हे सर्प माथींचा मणि । डंखिला प्राणि तैसें झालें ॥६॥
केशव म्हणे नामयातें । जे सर्वांभूर्ती भजती मातें । ऐसें हें वर्म सांगतसे तूतें । ऐसिया संतांतें म्हणिजे संत ॥७॥

53

हरिभक्तीचा उभारिला ध्वज । परमार्थाचें बीज न क-ळेची ॥१॥
काय करूं देवा जळो त्याची बुद्धी । जया नाहीं शुद्धि परलोकींची ॥२॥
मुद्रा धारण अंगीं तुळशीच्या माळा । परि नाहीं कळवळा खहिताचा ॥३॥
बहुरुपी वेष मिरविताती देहीं । पर-मार्थाची नाहीं आठवण ॥४॥
उपजीविकेलागीं घालिती पसारा । ज्ञान ते चौबारा विकीतसे ॥५॥
राजमान्य व्यापारी मोठे अधि-कारी । पुढें दावी कुसरी संगीताची ॥६॥
घातमात करी नटे ना-नापरी । चंचळ परनारी भुलवी तो ॥७॥
आपुलें लाघव दाऊनि वाडें कोडें । दुसर्‍याची पुढें होऊं नेदी ॥८॥
लटकें पैशून्य बोले दोष गुण । तेणें भयें कोण राहों शके ॥९॥
ऐसें नाम विटंबूनि करी हरीकथा । तेणें परमार्था विघ्न झालें ॥१०॥
सुगंध चंदन जवादि कस्तुरी । विष्टेचेचि थडी पडिली जैसी ॥११॥
नामा ह्मणे माझी हरिकथा माउली । विश्रांति साउली शिणलियाची ॥१२॥

54

काय चाड आह्मां बाहेरल्या वेषें । सुखाचें कारण असे अंतरीं तें ॥१॥
भीतरी पालट जंव नाहीं झाला । तोंवरी न बोल जाणपणें ॥२॥
चंदनाचे संगतीं नीच महत्त्वा पावलीं । नांवें परि उरलीं पालट देहीं ॥३॥
नामा ह्मणे ऐसें सांगा मज कोणी । जेणें केशव येऊनि ह्लदयीं राहे ॥४॥

55

अद्वैत सुख कैसेनि आतुडे । जंववरी नसंडे मीतूं-पण ॥१॥
शब्द चित्र कथा सांगती पाल्हाळ । मन नाहीं के-वळ विठ्ठलदेवीं ॥२॥
अणुचें प्रमाण असतां दुजेपण । मेरुतें समान देईल दु:ख ॥३॥
नामा ह्मणे सर्व आत्मरूप पाहीं । तरीच ठायींच्या ठायीं निवशील ॥४॥

56

एकचि हें तत्व एकाकार देशीं । एक तो ने-मेसी सर्व जनीं ॥१॥
ऐसें ब्रह्म पाहा आहे सर्व एक । न-लगे तो विवेक करणें कांहीं ॥२॥
मिथ्या हें डंबर माया मथितार्थ । हरि हाचि स्वार्थ वेगीं करीं ॥३॥
नामा ह्मने समर्थ बोलिला तो वेद । नाहीं भेदाभेद ब्रह्मपणीं ॥४॥

  • मुख्य पृष्ठ : संपूर्ण काव्य रचनाएँ : संत नामदेव जी
  • मुख्य पृष्ठ : हिन्दी कविता वेबसाइट (hindi-kavita.com)